अरुण भोई
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीने मुख्य चौक ते गावातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे पाटस मध्ये होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष राहणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून गावातल्या घडामोडी तसेच बारकावे यावर देखरेख आणि कामकाज होणार आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. अशी माहिती सरपंच रंजना पोळेकर यांनी दिली.
पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या कसबे पाटस हे संवेदनशील गाव आहे. यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलीस चौकी असली तरीही या ठिकाणी चोरी, अपघात, मारहाणीच्या घटना सातत्याने घडत असतात, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे अनेक आरोपी निष्पन्न होत नसल्याने पोलिसांना तपास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
अनेक वेळा ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, त्या कॅमेऱ्याची तपासणी करावी लागते. मात्र अनेक दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात मर्यादित अंतरापर्यंत लक्ष ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे रस्त्यावर घडणाऱ्या घटनांचे फुटेज त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत नाहीत. मात्र, आता पाटस ग्रामपंचायत पुढाकार घेत मुख्य चौक, मुख्य सार्वजनिक रस्ते, शाळा, ये-जा आणि वर्दळ असणाऱ्या ठिकाणी नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
मुख्य ठिकाणी तब्बल २१ सीसीटीव्हीची नजर
- राजमाता अहिल्याबाई होळकर चौक
- कारखाना रोडवरील उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला
- पुणे सोलापूर महामार्ग लगत असलेल्या पुणे बाजुकडे जाणारे बस स्थानक
- छत्रपती शिवाजी महाराज चौक
- श्री नागेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
- पाटस गावातून गेलेल्या मुख्य रस्त्यावर डॉक्टर जायभाय हॉस्पिटल
- मुख्य प्रवेशद्वार (वेश)
- ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस
- डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल
- नागेश्वर मंदिर व त्याच्या समोरील रस्त्यावर स्मशानभूमी
- पंचशील नगर
- डोंगरेश्वर नगर
- बाजार मैदान
- नागेश्वर आखाडातालीम या ठिकाणी २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
२१ पैकी ४ सीसीटीव्ही कॅमेरे ऑनलाईन चालू ठेवले जाणार असुन उर्वरित १७ कॅमेरे हे ऑफलाइन पद्धतीने केबल द्वारे चालू असणार आहेत. या कॅमेऱ्याचे देखरेखीचे काम हे ग्रामपंचायत कार्यालयातून पाहिले जाणार आहे. ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतून त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचे काम मार्गी लागले आहे. अशी माहिती सरपंच रंजना पोळेकर यांनी दिली.