पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई) घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आज बुधवार (ता.१५) पासून सुरू झाल्या आहेत. परीक्षेचा पेपर सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळात होणार आहे. दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान होतील.
यंदा सीबीएसई बोर्डाच्या ३८ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये दहावीच्या परीक्षेला एकूण ३१.८ लाख विद्यार्थी आणि १६.९ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील ७२०० केंद्रांवर आणि जगभरातील २६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, करोना काळात बोर्डाने परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण ९२.७१ टक्के तर दहावीमध्ये ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी सुमारे ३५ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शक सूचना :
१) सकाळी १० वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे परीक्षेला वेळेवर जा.
२) विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करावा
३) शाळेचे ओळखपत्र आणि सीबीएसईचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे.
४) केंद्राकडून परवानगी असलेले स्टेशनरी साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाता येईल. त्याव्यतिरिक्त इतर कोणतंही सामान सोबत नेऊ नका.
५) कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा मोबाईल फोन, जीपीएस, कॅल्क्युलेटर, गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक घड्याळे इत्यादी सोबत ठेवू नका.