पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना महाराष्ट्र विधीमंडळात सादर केलेल्या पेन ड्राईव्हवरुन सीबीआयने आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सरकारी वकील प्रविण चव्हाण, पुण्यातील तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण , विजय पाटील यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
त्याप्रकरणी त्यांनी पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील बसविलेल्या घड्याळाच्या कॅमेर्यातून हे सर्व व्हिडिओ रेकॉडिंग केले होते. या प्रकरणाचा तपास शिंदे सरकार सत्तेवर आल्यावर सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
या रेकॉर्डिग केलेल्या व्हिडिओमध्ये विशेष सरकारी वकील कट रचताना व भाजपच्या विविध वरिष्ठ नेत्यांना गुन्ह्यामध्ये अडविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी बोलताना दिसून येत आहेत. प्रविण चव्हाण हे अर्जदार आणि भाजपच्या इतर नेत्यांवर खोट्या तक्रारी तयार करणे, साक्षीदारांना शिकविणे, रोख रक्कमेची व्यवस्था करणे, तपास अधिकार्यांना सूचना देणे असे खोटे गुन्हे दाखल करण्यात गुंतलेले आहेत. तसेच चाकू लपविणे, छापा कसा टाकायचा, ड्रग व्यवसाय कसा दाखवायचा, केस कशी मोक्कामध्ये बसवायची, हे सांगताना प्रविण चव्हाण रेकॉडिंग केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत.
अॅड. प्रविण चव्हाण तसेच तक्रारदार विजय भास्करराव पाटील आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत भाजप नेत्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्लॅन आखला होता. त्यातूनच जळगावमध्ये शुन्य एफआयआर नोंदविला गेला. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज या संस्थेतील वादाबाबत हा झिरो एफआयआर पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी गुन्हेगारी कट रचण्यासाठी तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, विजय पाटील, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या सोबत खटल्यात भाजप नेते आणि इतरांना गुंतविण्यासाठी खोटे साक्षीदार व पुरावे बनविले असल्याचे या एफआरआयमध्ये म्हटले गेले आहे.