पुणे : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील फुलेनगर मांजरी बुद्रुक येथील फूड स्टॉल बंद असताना, उसने पैसे दिले नाहीत या कारणावरून तिघांनी लोखंडी हत्यारे हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली व फूड स्टॉलचे नुकसान केले. सोमवारी (ता. १) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सायली अतिश भुजबळ (वय २८ वर्षे, रा. झेड कॉर्नर, मांजरी बुदुक, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार केदारी (रा. केशवनगर, मुंढवा) याच्यासह त्याच्या इतर ३ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ‘मि. अॅन्ड मिसेस सँडविच’ नावाचा फुड स्टॉल मांजरी-केशवनगर रोडलगत जी.पी. फूड मॉलशेजारी आहे. आरोपी ओंकार केदारी याच्यासह त्याचे इतर ३ साथीदार पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमधून आले. उसने पैसे दिले नाहीत, या कारणाने त्यांनी फुड स्टॉलचे नुकसान केले. लोखंडी हत्यारे हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादीच्या पतीने याप्रकरणी आमच्यावर केस केली तर पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी ओंकार केदारी याने दिली. त्यानंतर याप्रकरणाची तक्रार दाखल केली.
आरोपी केदारी याच्यावर मुंढवा पोलीस स्टेशन येथे यापूर्वी २०२१ मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन दाभाडे करत आहेत.