पुणे : सातारा रस्त्यावरील शंकरबाबा महाराज मठ येथे आलेल्या चेतन आरडे यांना अडवून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह ४ जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन प्रभाकर आरडे हे दि. २० जून रोजी सातारा रस्त्यावरील शंकरबाबा महाराज मठ येथे माजी नगरसेवक महेश वाबळे यांच्या समवेत दर्शनासाठी गेले होते. तेथे रुद्राभिषेक पूजा चालू होती. यावेळी फिर्यादी आरडे यांनी पूजेच्या खोलीत जात असताना माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर व इतर यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी चेतन प्रभाकर आरडे यांनी तक्रार दिल्यावरून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुरन. २६८/२०२४ भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम Atrocities Act,, १९८९ ३(१) (r), ३(१) (s), ३(१) (y), अन्वये राजेंद्र यशवंत शिळीमकर, महेश यशवंत शिळीमकरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.