पुणे : दिवाळीनिमित्त रस्त्यावर फटाके फोडण्यावरुन एकाला जातिवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील शिरोळे रस्त्यावरील किओस्के कॅफेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडला आहे. या प्रकरणी एका कॅफे मालकावर डेक्कन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुश्रुत नेताजी कांबळे (वय-२७, रा. गोखले नगर, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जिप्सी कॅफेचे मालक आशिष पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (ता.१२) रात्री साडेआठच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे रविवारी त्यांच्या कॅफेमध्ये लक्ष्मी पुजन करत होते. त्यावेळी सार्वजनिक रस्त्यावर इतर लोक फटाके उडवत होते. फिर्यादी बाहेर आले असता जिप्सी कॅफेचा मालक आरोपी आशिष पाटील फिर्यादीच्या अंगावर धाऊन गेला. तसेच जातिवाचक शिवीगाळ करुन धमकी दिली. या वेळी आरोपीने फिर्यादी यांच्या भावाला हाताने मारहाण करुन, कॅफेच्या भागिदारांना धक्काबुक्की केली. दरम्यान, वाद चिघळत असल्याचे पाहून फिर्यादी यांच्या पत्नी वाद मिटवण्यासाठी मध्ये आल्या. त्यावेळी आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर साळुंखे करीत आहेत.