पिंपरी : मोशी प्राधिकरणातील प्रिव्हिया मॉल येथील वाईन शॉपमध्ये जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दिली असताना कामगार साडेपाच लाख रुपये घेऊन पळून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सकाळी घडली.
याप्रकरणी रितिक हरीश छाबडा (वय-२१, रा. कस्तुरी एपीटोम सोसायटी, वाकड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी महेश नरेशकुमार छाबरीया (वय-२१, रा. त्र्यंबकेश्वर बिल्डिंग, इंद्रायणीनगर, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मोशी प्राधिकरणातील प्रिव्हिया मॉलमध्ये वाईन शॉप आहे. त्यांच्याकडे महेश छाबरीया हा कामगार कामाला आहे. शुक्रवारी सकाळी वाईन शॉपमध्ये जमा झालेली ५ लाख ५३ हजार ६०० रुपयांची रक्कम फिर्यादी यांनी महेश छाबरीया याच्याकडे बँकेत भरण्यासाठी दिली.
मोशी प्राधिकरण येथील आयसीआयसीआय बँकेत ही रक्कम भरण्यास सांगितले होते. मात्र, महेश छाबरीया याने ही कॅश बँकेत न भरता फरार झाला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही महेश छाबरीया हा परत आला नाही. त्यामुळे त्यांनी बँकेत चौकशी केल्यावर त्याला महेश याने बँकेतही पैसे जमा केले नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक रणसौर तपास करीत आहेत.