पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याने नगरमधील नालेगाव येथे प्लॉट घेतला होता. मात्र, मूळ मालकाच्या परस्पर विक्री केलेला होता. त्यामुळे मुळ मालकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ताब्यात घेण्यास मनाई करूनही शरद मोहोळ याच्या पत्नीच्या सांगण्यावरून दोघा जणांनी प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रामेश्वर बालुराम कलवार (रा. चैतन्य नगर, सावेडी, नगर, सध्या रा. विमाननगर, पुणे) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अक्षय सतीश डाके (रा. नगर), शाहीद सैद शेख (रा. नगर), स्वाती शरद मोहोळ (रा. पुणे) यांच्यासह अन्य पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालेगाव येथे रामेश्वर कलवार याचे वडील बालुराम रघुनाथ कलवार यांच्या नावाने एक प्लॉट होता. मात्र, २०१९ मध्ये त्यांचे वडील बालुराम कलवार यांचे निधन झाले. हीच संधी साधून सुर्वेद्र डांबी याने वडिलांच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून ४ जानेवारी २०२३ रोजी बनावट खरेदी केली. हे समल्यानंतर संतोष डांबी याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी डाबी याला अटक केली. त्यानंतर डाबी जामीनावर बाहेर आला. त्याने न्यायालयाच्या अटी-शर्तीचे उल्लंघन करीत पुन्हा १ जून २०२३ रोजी प्लॉट पुण्यातील शरद हिरामन मोहोळ (रा. शिवतीर्थ, कोथरूड, पुणे) यांना विक्री केला. ही खरेदी रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र, संतोष डाबी याच्याविरुद्ध न्यायालयात सुनावणी सुरू असताना पुन्हा या प्रकरणामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, असे न्यायालयाने सुनावले. दरम्यान, ५ मे २०२४ रोजी शरद मोहोळ याचा मृत्यू झाला.
दरम्यान, काही जणांनी प्लॉटवर जाऊन जेसीबीने सीसीटीव्हीची तोडफोड केली. त्यानंतर मॅनेजर प्रल्हाद पुरोहित हे प्लॉटवर गेले असता त्यांना देखील मारहाण करत इथे आला तर गोळ्या घालू अशी धमकी दिली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून स्वाती मोहोळ यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.