पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचाराही जोमात आला आहे. अशातच खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भरारी पथकातील समन्वय अधिकारी राहुल साळुंखे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहन ज्ञानोबा धावडे, संजय उर्फ बाबू दोडके, अजय पोळ (तिघे रा. वारजे माळवाडी) यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धावडे, दोडके, पोळ यांनी चांदणी लाॅन येथे रविवारी (१० नोव्हेंबर) सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी विनापरवानगी सभा, तसेच स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नागरिकांना समाज माध्यमातून संदेश पाठविले. ‘वारजेकरांचा निर्धार, सचिनभाऊ दोडकेच आमदार’, असे फलक कार्यक्रमस्थळी लावले. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी तपास करत आहेत.