यवत (पुणे): विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल नवरा व सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव येथील सारिका या तरुणीचे पडवी येथील प्रशांत शितोळे यांच्याशी विवाह झाला होता. ‘प्रसुतीसाठी गेलेले 25 हजार रुपये घेऊन ये’ अशी वारंवार मागणी करत सासू व पती यांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की केडगाव येथील सारिका या तरुणीचे पडवी येथील प्रशांत शितोळे यांच्याशी विवाह झाला होता , सारिका हिला एक मुलगा असून त्याचे ओठ जन्मताच दुभांगलेले आहेत. तसेच डिलिव्हरीसाठी गेलेले 25 हजार रुपये घेऊन ये अशी वारंवार मागणी करत सासू व पती यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ करत होते. सारिका यांनी पती प्रशांत शितोळे याचे बाहेर चालू असलेल्या अनैतिक संबंधांविषयी विचारणा केली असता पतीने शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून पत्नी सारिका शितोळे हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
त्यानंतर दि. 17 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विषारी कीटकनाशक पिऊन विवाहितेने आत्महत्या केली. याबाबत मयत विवाहितेचे वडील जयसिंग पवार यांच्या फिर्यादीवरून सारिका हिचे पती प्रशांत मानसिंग शितोळे व सासू सुनिता मानसिंग शितोळे (दोघेही रा.पडवी,ता. दौंड,जि. पुणे) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशांत शितोळे यास अटक करण्यात आली असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.