पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमाने एकीला लग्नाचे आमिष दाखवले आणि दुसरीसोबत लग्न केल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. कृष्णा जाधव (३२, रा. स्वामी समर्थ नगर, आडगाव शिवार, पंचवटी, नाशिक) याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने बुधवारी (दि. १७) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वडगाव शेरी आणि गोवा येथील रिसॉर्टमध्ये घडला असल्याचे सांगितले.
फिर्यादी व आरोपी नाशिक येथील एका बँकेत नोकरी करत होते. त्यावेळी त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, पीडित तरुणीला पुण्यात नोकरी लागल्याने ती पुण्यात वडगाव शेरी परिसरात राहण्यास आली. आरोपी कृष्णा जाधव याने फिर्यादी यांना पुण्यात भेटण्यासाठी येऊन लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. अनेक वेळा तो तरुणीच्या राहत्या घरापर्यंतदेखील पोहोचला होता.
यानंतर आरोपीने आपल्या संबंधाबाबत कोणाला सांगितले तर तुझे तुकडे करीन अशी धमकी दिली. त्यानंतर, आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. याबाबत पीडित तरुणीला समजले असता, तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात जाऊन कृष्णा जाधव याच्या विरोधात तक्रार दाखल केली.