पुणे : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करून देखील पुन्हा जास्तीच्या पैशांची मागणी करुन घरात घुसून मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी ८ जणांवर महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते १५ जुलै २०२४ या कालावधीत भवानी पेठ परिसरात घडला आहे.
याबाबत इक्बाल महंमद फरीद शेख (वय-40 रा. राजीव गांधी वसाहत, गुरुनानक नगर, अमीना टॉवर, भवानी पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून झहिर मझिद शेख, फिरोज शेख, मुमताज समशेर शेक, कविता डाडर, अजीज शेख, नाविद शेख (सर्व रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) आसमा शेख (रा. चुडामन तालीम, भवानी पेठ), समीर शेख (रा. कोंढवा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इक्बाल शेख यांनी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, त्यांनी घेतलेले पैसे जास्तीच्या व्याजासह आरोपीना परत केले होते. तरीही आरोपींनी शेख यांच्याकडे जास्तीचे पैसे मागितले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून समाजात बदनामी करु आणि गुंड आणून पैसे वसूल करु, अशी धमकी दिली. तसेच घरात घुसून मारुन टाकीन, तु मेला तरी तुझ्या बायको व वडिलांकडून पैसे वसुल करून घेईन अशी दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.