पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणं सुनील कांबळे यांच्या अंगलट आलं आहे.
आमदार सुनील कांबळे यांनी दुपारी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल होताच विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरलं होतं. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उचलण्याची हिंम्मत झालीच कशी, असा सवाल विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. गृहमंत्री याची दखल घेणार का? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत होते.
तसेच पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर पुणे पोलिसांनी आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यातील ससून रुग्णालयातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी ५ जानेवारीला एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. भाजप आमदार सुनील कांबळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी सरक यांच्या कानशिलात लगावली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी देखील भाजप विरोधात जोरदार टीका केली होती.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर स्पष्टीकरण देताना आमदार सुनील कांबळे म्हणाले की, मी फक्त त्या व्यक्तिला ढकललं. मी कानशिलात लगावली नाही. कानशिलात मारण्याचा प्रकार वेगळा असतो. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे, कानशिलात कशी मारतात, हे मला चांगलं माहिती आहे असं कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.