पुणे : आचारसंहिता काळात सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा जमाव जमवून आचारसंहितेचा भंग न केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजेंद्र नशिळीमकर, महेश बावळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई अभिजित वालगुडे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि आणि कार्यकर्त्यांनी पद्मावती परिसरात पैसे वाटपाचा आरोप करून सहकारनगर पोलिस ठाण्याच्या आवारात गेल्या रविवारी (दि. १२ मे) ठिय्या आंदोलन केले होते. भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप धंगेकर आणि आणि कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक शिळीमकर, वाबळे यांच्यासह पदाधिकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात गेले होते.
पोलिस ठाण्याच्या परिसरात बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी केल्याचे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आचारसंहितेचा भंग, तसेच बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.