पिंपरी : आळंदी येथे बालविवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार वडगाव रस्त्यावरील गंधर्व मंगल कार्यालयात २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी मिलिंद सोपानराव वाघमारे (वय-४५, रा. परभणी) यांनी शुक्रवारी १० जानेवारी रोजी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गंधर्व मंगल कार्यालयाचे संचालक व इतर सेवा पुरवणारे व्यवस्थापक यांच्यासह १२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गौरव सुभाष मुरक्या (रा. साळवेश्वर नगर, ब्रह्मा-विष्णू महेश अपार्टमेंटच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी) याच्यासह बालिका वधुची आई, मामा, मामी (तिघे रा. कारेगाव, पुणे), सासरे सुभाष भोलाराम, सासू, शुभम सुभाष मुरक्या, जाउ, संतोष भोलाराम मुरक्या, प्रमोद भोलाराम मुरक्या (रा. परभणी) यांच्या सह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद वाघमारे हे परभणी येथील रहिवाशी आहेत. वाघमारे हे नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा परभणी येथील शहर विभागाचे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. १७ वर्ष पाच महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे गौरव मुरक्या याच्यासोबत संशयितानी लग्न लावून दिले. तसेच इतर संशयितांनी हा बालविवाह करण्यासाठी मदत केली. या बालविवाहाबाबत मिलिंद वाघमारे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.