-प्रदिप रासकर
निमगाव भोगी : बनावट रेशनिंग कार्ड दिल्याप्रकणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे. खंडणी मागणा-या दोघांवर खेड पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात महेश लक्ष्मण नेहरे (रा. वाडा, ता. खेड) व सुनील किसन नंदकर (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) यांच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. 29) रात्री गुन्हा दाखल करण्यात झाला.
याबाबत पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, तहसीलदार देवरे यांना व्हॉट्सअॅपवर काही मेसेज आले. तुमच्या कार्यालयातील अव्वल कारकून सुनील नंदकर यांनी माझी पत्नी स्नेहल महेश नेहरे या नावाने बनावट रेशनिंग कार्ड मला ऑफलाइन बनवून दिले.
तहसीलदार यांचा शिक्का मारून त्याखाली ‘करिता’ म्हणून त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. त्यासाठी मी त्यांना 4 हजार रुपये ऑनलाइन लाच पाठवली होती. हे प्रकरण दडपण्यासाठी तुम्ही मला सामाजिक कामासाठी 10 लाख रुपये द्या. मी तुमच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेतो, अशा आशयाचा मेसेज आला. तसेच पेमेंट पाठविल्याचे काही स्क्रीन शॉट देखील पाठविले. त्यामुळे देवरे यांनी पोलिसांना तक्रार अर्ज दिला.
याप्रकरणी खेड पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक अक्षय कोरपे यांनी महेश लक्ष्मण नेहरे (रा. वाडा, ता. खेड) व सुनील किसन नंदकर (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) यांच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक पुनाजी जाधव करत आहेत.