पुणे : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केल्यानंतर आता आणखी एक बातमी समोर आली आहे. रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंस्टा वर व्हिडिओ टाकणारा शुभम शिंदे आणि रॅपर आर्यन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या तरुणाचा शोध घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या अकाऊंटची माहिती घेण्यासाठी इन्स्टाग्रामला पत्र पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताच्या अनुषंगाने सोशल मिडियावर रिल्स, मिम्स आपलोड करण्यात येत होते. त्यातच अल्पवयीन आरोपी मुलाप्रमाणे दिसणाऱ्या एका तरुणाची एक रील व्हायरल झाली होती. त्यामध्ये आक्षेपार्ह व अश्लिल वक्तव्ये करण्यात आलेली होती. हा व्हिडिओ या अल्पवयीन मुलाचा असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. मात्र, हे व्हिडिओ आरोपी मुलाचे नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. तसेच, मुलाच्या आईने देखील त्याचा खुलासा केला होता.
कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताचे रील आपलोड करण्यात आले होते. त्यामध्ये समाजातील स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल अशी व नितीभ्रष्ट करणारी अश्लिल वक्तव्ये केले होते. त्यामुळे ही रिल तयार करणारे तसेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसारीत करणाऱ्या अज्ञात इन्स्टाग्राम अकाऊंटधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम कंपनीला या दोन्ही इन्स्टाग्राम अकाऊंटची ‘युआरएल’ तसेच वादग्रस्त रिल आपलोड करणाऱ्या ‘युआरएल’ची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त होताच तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना अटक करण्यात येणार आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.
सुरेंद्र अगरवाल यांच्या घरावर छापेमारी
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अगरवाल यांच्या घरावर छापेमारी सुरु आहे. पुण्यातील त्यांच्या निवास्थानी छापा टाकला. पंचनामा करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक थेट अगरवाल यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. ड्रायव्हर पुजारी याला कुठे डांबून ठेवले हे शोधण्यासाठी गुन्हे शाखेची छापेमारी सुरु आहे.