शिरूरच्या आनंद पतसंस्थेच्या अध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हा; १६ कोटींची अफरातफर करत गुंतवणूकदारांची फसवणूक
शिरुर, (पुणे) : शिरूर येथील आनंद नागरी पतसंस्थेत १६ कोटी ७० लाख ५४ हजार ३६१ रुपयांच्या रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आनंद नागरी पतसंस्थेचे चेअरमन अभयकुमार चोरडिया यांच्यासह व्यवस्थापक व अन्य 14 जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 31 डिसेंबर 2013 ते 20 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये शिरुर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेमध्ये घडला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर येथे आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ही संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार पोपटलाल चोरडिया, संचालक प्रविण चंपालाल चोरडीया, मुरसलीन वहिंद मोहमद, सनी धरमचंद चोरडीया, सविता अभयकुमार चोरडिया, सुजाता नितीन चोरडिया, प्रितम प्रविण चोरडिया, श्रीमती पारसबाई पोपटलाल चोरडीया, चंपालाल बुधमल चोरडिया, सुरेंद्रकुमार रतनलाल चोरडिया, शांताराम गंगाधर देवकर (संस्था व्यवस्थापक) या व्यक्तींनी चाचणी लेखापरीक्षणानुसार संस्था कामकाजात निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी, अपहार, अफरातफर, अनियमितता करुन संस्था सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघात करून फसवणूक केली.
तसेच श्रीमती सरिता ब्रिजमोहन सिंह, सनदी लेखापाल, नागेंद्र एच. सोरटे, प्रमाणित लेखापरीक्षक अजय एच. सोरटे, प्रमाणित लेखापरीक्षक यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम हीआपल्या फर्मच्या नावे कर्जाचे वितरण करून ठेवीदारांच्या १६ कोटी ७० लाख ५४ हजार ३६१ रुपये रक्कमेचा अपहार करून ठेवीदारांचा विश्वासघात केला. याप्रकरणी १४ जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक मुजावर अधिक तपास करत आहेत.