पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ भरधाव ‘पीएमपीएमएल’ बसच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशीबाई पांडुरंग खुरंगुळे (वय-६०, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी मल्हारी पांडुरंग खुरंगुळे (वय-३१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पीएमपी चालक दिलीपराव वामनराव लहाणे (वय-५०, रा. मांजरी रस्ता, गोपालपट्टी, मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मल्हारी खुरंगळे हे आई-वडील मुलासह धायरीत राहतात. मृत काशीबाई खुरंगळे या राजेंद्र नगर मध्ये राहणाऱ्या मुलाकडे आल्या होत्या. परत घरी जाण्यासाठी काशीबाई या सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ असलेल्या बसथांब्याजवळ उभ्या होत्या. त्या लहाणे चालवीत असलेल्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होत्या.
पाठीमागील दरवाजामधून बसमध्ये चढत असतानाच चालकाने बस सुरू करून हलगर्जीपणाने पुढे नेली. त्यावेळी काशीबाई खाली पडल्या. त्यावेळी बसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेले. या घटनेत त्यांचा डावा पाय तुटला. तर, उजव्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या काशीबाई यांना तातडीने उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत.