राहुलकुमार अवचट
यवत : यवत येथील खडकवासला कालव्या शेजारील असणाऱ्या ३ शेतकऱ्यांच्या सुमारे १ लाख रुपये किंमतीच्या मोटरींची चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १७ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याबाबत शेतकरी अशोक प्रभाकर मलभारे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या अनेक शेतकऱ्यांना कधी दुष्काळी परिस्थितीला तर कधी अवकाळी पावसाला तोंड द्यावे लागत असतानाच यवत येथील शेतकऱ्यांना मोटर चोरीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस स्टेशन पाठीमागे असलेल्या आनंदग्राम सोसायटीच्या शेजारी कालव्यातून पाणी घेण्यासाठी शेतकरी अशोक मलभारे हे १७ ऑगस्ट रोजी गेले होते. त्यावेळी २५ हजार रुपये किंमतीची मोटार चोरी केल्याचे मलभारे यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, आजूबाजूस पाहणी केली असता सदानंद वामन दोरगे यांची ७० हजार रुपये किंमतीची आणि राजेंद्र पोपट दोरगे यांची ५ हजार रुपये किंमतीची अशा एकूण १ लाख रुपये किमतीच्या तीन मोटारी चोरून नेल्याचे आढळून आले. याबाबत शेतकरी अशोक मलभारे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार नगरे हे करत आहेत.
मोटार चोरीचे सत्र सुरूच
यवत परिसरात अनेक दिवसांपासून बंद असलेले मोटार चोरीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी शेतकरी शेतात व कालवा परिसरात चकरा मारू लागले आहेत.