पुणे : पुणे रेल्वे स्टेशनजवळ गांजा तस्करी करणा-या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 75 हजार रुपये किंमतीचा 61 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
मानश कुमार स्वाईन (वय-38, रा, हरीहरुपर, जि.नयाघर, ओडिशा), लालमोहन फ्रान्सीस बिर (वय-34, रा. अतंराबा, जि. गजपती, ओडिशा), श्रीकांत अभिमन्यु बिरा (वय-37, रा. मोहना, जि.गजपती, ओडिशा) अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनजवळील आगरकरनगर परिसरामध्ये गांजा विक्री करण्यासाठी तीनही आरोपी आले असल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना समजली. माहिती समजताच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-दोनचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, संदीप जाधव, युवराज कांबळे, सय्यद साहिल शेख, आझीम शेख आदींनी सापळा रचून तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.