पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (दि. ४) शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी या वेळेत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु, पुणे शहरामध्ये एका उमेदवाराला केवळ ३ मिनिटे उशिर झाल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही. शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास उशिर झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन तावरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी विनंती करून देखील त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला असल्याची चर्चा आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार सचिन तावरे यांना निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. तावरे यांना रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. रिक्षा चिन्हावर सचिन तावरे निवडणूक लढवणार असून त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली नाही. त्यानंतर आपण कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे सचिन तावरेंनी स्पष्ट केले आहे.