बापू मुळीक
पुरंदर : श्री क्षेत्र वीर( ता. पुरंदर) या ठिकाणी लपतळवाडी येथे शशिकांत गुलदगड या शेतकऱ्याच्या दीड वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. शशिकांत गुलदगड हे सकाळी सहा वाजता शेतावर आल्यानंतर त्यांना दीड वर्षाचे वासरू मृता अवस्थेत आढळले. शेतकरी पिकाला बाजारभाव नसल्यामुळे, कर्जाच्या खाईत लोटला आहे. त्यात शेतीला जोडधंदा म्हणून गोपालन करतानाही बिबट्याचे गोधनावर हल्ले होत असल्याने, तो खचला आहे.
दरम्यान बिबट्याने वीर आणि परिसरामध्ये अनेक वासरासह, कुत्र्यावर अनेकदा हल्ले केले आहेत. तरीही वन खात्याला जाग येत नाही. हल्ला झाल्यानंतर वन कर्मचारी पंचनामा करून शेतकऱ्याला भरपाईचा दिलासा देतात. परंतु शेतकऱ्याला भरपाई मिळण्यासाठी अनेक महिन्याची वाट पाहावी लागते. शिवाय तुटपुंजी भरपाई मिळत असल्याने शेतकरी निराश होत आहे.
लपतळवाडी येथील बिबट्याच्या हलल्यात ठार झालेल्या वासराचा पंचनामा केला आहे. संबंधित शेतकऱ्याला जास्तीत जास्त भरपाई मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. तसेच परिसराची रेकी करून बिबट्याला पकडण्यासाठी वरिष्ठ ना कळवण्यात येईल.
अनिल खोमणे, वनपाल