पुणे : पुण्यातील औंध परिसरातील डी.पी. रोडवर केबल टाकण्याचे काम करणाऱ्या कामगाराला शिवीगाळ करुन कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी ४ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार २८ मार्च रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी प्रकाश बासु राठोड (वय-२१ रा. शांतीनगर, भोसरी) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ओम विजय पाटील (वय २१), अनिकेत अनिल उमाप (वय -२१) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. ओम आणि अनिकेत यांना अटक केली असून अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे सहकारी नवीन राठोड, व्यंकेश चव्हाण, नितीन राठोड, अभिषेक चिन्ना राठोड, मिथुन पवार हे औंध येथील डीपी रोडवर केबल टाकण्याचे काम करत होते. दरम्यान, आपल्याला कोणीतरी मारायला येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यामुळे आरोपी डीपी रोडने जात असताना त्यांना फिर्यादी व त्यांचे सहकारी दिसले.
आरोपींच्या हातात कोयते असल्याने फिर्यादी आणि त्यांचे इतर सहकारी घाबरून पळून जाऊ लागले. हेच लोक आपल्याला मारण्यासाठी आल्याचा गैरसमज आरोपींचा झाला. त्यामुळे त्यांनी अभषेक याला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जमिनीवर पाडले. त्यानंतर हातातील कोयत्याने अभिषेक याच्या डोक्यावर, हातावर व पायावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत.