पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे त्यांच्या मूळगावी म्हणजे पुणे जिल्ह्यातील कनेरसर येथे आले आहेत. सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच गावी आलेल्या चंद्रचूड यांचं गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. पारंपरिक पोशाखात सरन्याधीश धनंजय चंद्रचूड पत्नीसह गावी आहे. गावकऱ्यांसोबत बोलत असताना चंद्रचूड यांनी स्त्रीसशक्तीकरणाची बीजे आपल्यामध्ये कशी रुजली ते सांगितलं. आपल्या पणजीने मुलांना घेऊन पुणे गाठलं आणि मुलांना शिकवल्याचं चंद्रचूड यांनी सांगितलं.
खेड तालुक्यात कन्हेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं गाव आहे. या गावात त्यांचा जुना वाडासुद्धा आहे. चंद्रचूड यांनी गावात यमाईदेवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी ते पारंपरिक पोषाखात ते आले होते. यमाईदेवीमुळे आपण सरन्यायाधीश झालो. अयोध्या प्रकरणात निकालावेळी देवावरची श्रद्धा आणि विश्वासामुळे मार्ग निघाला असं डीवाय चंद्रचूड यांनी सांगितलं.
डीवाय चंद्रचूड म्हणाले की, स्त्री सशक्तीकरणाची भावना आईमुळे मनात निर्माण झाली. आमची आजी, पणजी गाव सोडून ९ मुलांसोबत पुण्याला आली. कनेरसरहून पुणे गाठलं. पुरुष मंडळी सगळी कनेरसरला राहिली. ९ मुलांना शिक्षण कसं द्यायचं हा प्रश्न होता. त्या महिला पुण्याला स्थायिक झाल्या. दागिने विकून मुलांना शिकवण्यासाठी खर्च केला.
माझे आजोबा आणि त्यांचे सगळे भाऊ मोठ्या हुद्द्यावर पोहोचले. माझे आजोबाही दिवाण झाले सावंतवाडीचे. माझ्या वडिलांचे एक चुलते वकील झाले. एका स्त्रीमुळे एका कुटुंबाचं परिवर्तन कसं होतं हे यामध्ये दिसून येतं. मला अभिमान वाटतो की माझी पत्नी स्त्री सशक्तीकरणासाठी कार्यरत असते. दोन लहान मुलींना दत्तक घेतलं आहे. त्यांचे वडील आमच्यासोबत काम करायचे. त्या मुलींचं संगोपन करताना आम्हाला जीवनाचे अनेक पैलू सापडतात असं चंद्रचूड यांनी म्हटलं.
चंद्रचूड यांनी यावेळी गावकऱ्यांचं आभार मानले, ते म्हणाले की, आज तुम्हा सर्वांना भेटून आणि मूळगावी येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. माझ्या पूर्वजांचे आणि मातीचे स्मरण मनात असेल. यमाईदेवीच्या कृपेनं मी भारताचा सरन्यायाधीश झालो. न्यायालयात काम करताना सोल्युशन सुचत नाही. अयोध्येचं काम आलं होतं तेव्हा त्यावर तीन महिने विचार करत होतो. शेकडो वर्षे ज्याला सोल्युशन मानलं नाही ते आमच्यासमोर होतं. त्यावेळी असं झालं की मार्ग कसा शोधायचं हे माहिती नव्हतं. तेव्हा दररोजची पूजा करतो तसं देवापुढे पूजा करत होतो आणि त्यांना सांगितलं की मार्ग तुम्हीच शोधून द्या. जर तुमचा विश्वास असेल आणि आस्था असेल तर मार्ग नेहमी देव शोधून देत असतो.