पुणे : किरकोळ कारणावरुन होणाऱ्या वादाचे रुपांतर अल्पावधीत मोठ्या गुन्ह्यामध्ये होत असल्याची अनेक उदाहरणे उघड होत आहेत. नुकतेच पाच जणांच्या टोळक्याने १८ वर्षांच्या तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला पट्ट्याने बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील शेती महामंडळ चौकातील जनकवाडी परिसरात घडला. याप्रकरणी निखिल विजय कुसाळकर व त्याच्या इतर ५ साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ९६ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. गुन्ह्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या दरम्यान घडली होती.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात टोळी प्रमुख निखिल विजय कुसाळकर (वय २२, रा. वडारवाडी, दीप बंगला चौक, पुणे), सुबोध अजित सरोदे (वय-२०, रा. पांडवनगर, पुणे), ओंकार सोमनाथ हिंगाडे (वय २२, रा. पी.एम.सी. कॉलनी, पांडवनगर, पुणे), अभिजीत उर्फ प्रफुल्ल बबन चव्हाण (वय-२१, रा. चाफेकर नगर, शिवाजीनगर, पुणे), अयाज रईस उर्फ रईसुद्दीन इनामदार (वय-१९, रा. जनवाडी, पुणे), कल्पेश उर्फ पाकुळी रमेश कराळे (रा. गोखलेनगर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, ओंकार हिंगाडे याला अटक केली आहे. इतर आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तरुणाला यश बोरकर याच्यामार्फत शेती महामंडळ चौकात बोलावून घेतले. फिर्यादी त्याठिकाणी आला असता आरोपींनी ‘तू निशांत डोंगरे सोबत का राहतोस, त्याने मला शिवीगाळ केली आहे’, असे म्हणत जबरदस्तीने अपहरण केले. त्याला कालव्याच्या बाजुला नेऊन एक तास हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला जनकवाडी येथील आयाज इनामदार याच्या घरी नेले. त्याठिकाणी त्याला पुन्हा बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केला. या घटनेनंतर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे करीत आहेत.