पुणे : शहरातील ड्रग्ज रॅकेटमध्ये सक्रीय असलेल्या नायजेरीयन आणि आफ्रिकन देशांमधील तस्करांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. बुधवारी पहाटेपासून गुन्हे शाखेच्या तब्बल दहापेक्षा अधिक पथकांनी १३ ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुण्यामधील कोंढवा भागातील ‘शालिमार’ सोसायटीसह आणखी तीन सोसायट्या, हडपसर, वानवडी आणि कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. कोंढवा भागातील शालिमार ही सोसायटी नायजेरीया, घाणा, आफ्रिका आदी ठिकाणांवरुण पुण्यात आलेल्या नागरिकांच्या वास्तव्यासाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेकदा पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे.
पुण्यात यापूर्वी झालेल्या अमली पदार्थांच्या विविध कारवायांमध्ये आफ्रिकन देशांमधील तरुणांचा सहभाग समोर आला होता. पुण्यात ड्रग्ज तस्करीच्या साखळीमध्ये नायजेरियन आणि आफ्रिकन तरुण तरुणींचा सर्वाधिक सक्रिय सहभाग आहे. त्यांनी शहरात तस्करीचे जाळे तयार केले आहे. महाविद्यालयीन तरुणांना या जाळ्यात ओढून आर्थिक उलाढाल केली जात आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी छोट्या तस्करांना ‘टार्गेट’ करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. दोनच दिवसांपूर्वी कोंढवा भागात झालेल्या ‘इफ्तार’ कार्यक्रमात त्यांनी बेकायदेशीर धंद्यांची माहिती देण्याचे आवाहन केलेले होते. त्या पार्श्वभूमीवर या भागातील नायजेरीयन आणि आफ्रिकन देशातील तरुणांकडून होणाऱ्या उपद्रवाबाबत देखील पोलीस आयुक्तांकडे तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी पहाटेच छापेमारीला सुरुवात केली. यामध्ये काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून विविध प्रकारचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.