पुणे : औंधमधील उद्योजकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची (सीबीआय) बनावट नोटीस पाठवून एक कोटी तीन लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका उद्योजकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार उद्योजकाचा वाहनांचे सुटे भाग निर्मितीचा व्यवसाय आहे. गेल्या महिन्यात ३ मार्च रोजी चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. चोरट्याने दूरसंचार मंत्रालयातील अधिकारी बोलत असल्याचे सांगून तुमच्या मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना फसवे संदेश पाठविले जात आहेत. या प्रकरणी मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर उद्योजकाच्या मोबाइल क्रमांकावर आणखी एकाने संपर्क साधला. सीबीआयच्या नावाने बनावट नोटीस तक्रारदाराला पाठविली. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्याने सीबीआयकडून तपास करण्यात येत असल्याची बतावणी सायबर चोरट्याने केली. तसेच चोरट्याने याबाबतची माहिती अन्य कोणाला देऊ नये, असे सांगितले. तसेच त्यानंतर बँक खात्यात काळा पैसा असल्याची बतावणी चोरट्याने केली. सायबर चोरट्यांनी खात्यातील व्यवहारांची तपासणी करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केल्याचे तक्रारदाराला सांगितले.
तसेच सायबर चोरट्याने उद्योजकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. बँक खात्यातील निधी अन्य खात्यात हस्तांतरित करण्याची सूचना दिली. राष्ट्रीय सुरक्षा कायदा, बेकायदा आर्थिक व्यवहार प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. त्वरित बँक खात्यातील पैसे हस्तांतरित करण्याची सूचना देऊन चोरट्याने एक कोटी तीन लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तक्रारदार उद्योजकाने त्वरित अॅड. सत्या मुळे यांच्याशी संपर्क साधला. अॅड. मुळे यांनी त्यांना सहाय्य करून याबाबतची तक्रार पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात देण्यास सांगितले. अॅड. मुळे यांना अॅड. अमृता कुलकर्णी, अॅड. नेहा भुरट यांनी सहाय्य केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील पुढील तपास करत आहेत.