-गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातल्या विविध एसटी आगारामध्ये असलेल्या बसगाड्या रस्त्यावर धावतांना मध्येच बंद पडत आहे. त्यामुळे दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच बस बंद पडत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
कळंब – वालचंदनगर मार्गावर शनिवारी (ता. 07) रात्री बारामती वरून वालचंदनगरकडे निघालेली बस डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे बंद पडली. या बस मध्ये जवळपास 100 ते 150 प्रवाशी प्रवास करत होते. या बस मध्ये विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे प्रवाशी जास्त प्रमाणात चालकाला बस बंद बाबत विचारणा केली असता घोटाळा आहे. बस पुढे घेता येणार नाही. त्यावर त्या मध्ये प्रवास करणारे विद्यार्थी व शिक्षक व कामावरून घरी जाणा-या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. एसटी व बाहेर एकच गोंधळ सुरु झाला.
महाविद्यालयीन मुलींची संख्या जास्त असल्याने डोर्लेवाडी येथील गावकऱ्याकडून सर्वच प्रवाशांना विचारणा केली. तसेच एसटी चालकाला तरुण मुली अश्या रस्त्याला किती वेळ उभा राहणार आहेत. एवढा उशीर व अंधार पडल्याने सर्वजण काळजी करत होते. या मुलींची लवकरात लवकर घरी पोहचवण्याची व्यवस्था करा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, परिवहन विभागातील आशा बंद पडक्या बस प्रवाशांच्या सेवेत असल्याने याचा नाहक त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सोसावा लागतो. शनिवारी हाच प्रत्यय वालचंदनगर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आला. डोर्लेवाडी येथे बस नादुरुस्त झाली तेव्हा यात बालके, महिला व वयोवृद्ध मंडळी होती. एक तासाच्या अवधीनंतर दुसरी बस तिथे पोहचल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
याबाबत बोलताना कॉलेजच्या विद्यार्थींनी अनिशा देवकाते, सोनगावं, तृप्ती खरात, प्रगती कांबळे, नातेपुते म्हणाल्या की, वेळेवर बस येत नाही. एका बसमध्ये दोन बस चे लोक बसवतात. 5 वाजताची बस ही 6 वाजता येते. या रूट ने बस कमी आहेत बस सतत बंद पडतात. लांब जाणाऱ्या मुलींनी मध्येच रस्त्यात बस बंद पडल्यावर काय करावे, सायंकाळी कॉलेजचे मुले मुली भरपूर असतात. त्यामुळे गर्दी भरपूर होते. त्यामुळे कॉलेजच्या मुला मुलींकरिता वेगळी बस मिळावी.