राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या देऊळगाव वाडा व हातोळण या गावच्या हद्दीत चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी करून सुमारे ४ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हातवळण गावच्या हद्दीतील म्हेत्रे वस्ती, कानगाव रोड येथील रणधीर गवळी यांच्या बंद खोलीचा दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटातून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २.५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, २५ हजार रुपये किंमतीची अर्धा तोळे वजनाची कानातील फुले व रोख रक्कम ५० हजार रुपये असा एकूण २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत रणधीर तुकाराम गवळी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
दुसरी घटना देऊळगाव गाडा गावच्या हद्दीतील बारवकरवाडी येथे घडली. १६ जानेवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास लिलाबाई हनुमंत बारवकर यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लिलाबाई बारवकर यांना कोयत्याचा धाक दाखवून ६७ हजार ५०० रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे पोत, ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, बेडरूमच्या गादीखालील व हॉलच्या कपाटातील २ लाख ५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
याबाबत लिलाबाई हनुमंत बारवकर यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत.