पुणे : शहरात उष्णतेच्या झळा तीव्र होत असतानाच तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याची घटना बुधवारी घडली. मुंढवा येथील झगडे पार्क परिसरातील संकल्प बंगल्यात स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याने आग लागली. या आगीत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या आगीत अंजली इश्वर सकट (वय ५८) आणि त्यांचा मुलगा जतिन (वय ३२) जखमी झाले आहेत.
दरम्यान, बंगल्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीत स्वयंपाकघरातील साहित्य जळाले आहे. तर अंजली आणि त्यांचा मुलगा जतिन जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. बुधवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, शौकत शेख तांडेल रणदिवे, जगताप, बिचकुले, कवडे, कांबळे यांनी पाण्याचा मारा करुन मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.
आगीची दुसरी घटना उंड्री येथील होले वस्ती परिसरात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. एका भंगार मालाच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर भंगार सामान जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जवानांनी आग आटोक्यात आणली. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर सोलेस पार्क सोसायटीत रोहित्राला आग लागली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
दरम्यान, आगीची तिसरी घटना खेड-शिवापूर परिसरात घडली. येथील एका रंगाच्या कंपनीत आग लागली. ‘पीएमआरडीए’च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.