पुणे : देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांनी महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, त्याच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्याच्याकडून जबरदस्तीने ४ लाख ९८ हजार रुपये घेतल्याने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस नाईक हेमंत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन शेजाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यासह अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय १९, रा. किवळे, पुणे, मूळ रा. झारखंड) या तरुणाने देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे आणि मोहम्मद अहमेर मिर्झा या चौघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान हा तरुण किवळे येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो महाविद्यालयाच्या हॉटेलमध्ये राहतो. देहू रोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून चौहानकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजता आरोपींनी किवळे येथील एका कॅफे मधून अपहरण केले. कॅफेमधून मायाज लॉन्ज, गहुंजे स्टेडीयम आणि तेथून तरुणाला देहू रोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी देण्यात आली. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
पोलिसांसह अन्य लोकांच्या धमकीला घाबरलेल्या चौहान याने गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे आरोपींना ४ लाख ९८ हजार रुपये दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र, संबंधित पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास देहू रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे करीत आहेत. त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी उत्तर दिले नाही.