भिगवण / सागर जगदाळे : अखिल भारतीय मराठा महासंघाने बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी लिमिटेड भादलवाडी व प्रशासन यांना माथाडी कामगार कंत्राटी कामगार आणि स्थानिक कामगार तसेच इतर मागण्यांसाठी सप्टेंबर 2023 रोजी लेखी निवेदन दिले होते. त्यावेळी 15 दिवसांमध्ये संघटनेच्या मागण्यांची पूर्तता करुन कामगारांना न्याय देण्याची मागणी केलेली होती. त्यानंतरही संघटनेच्या मागण्यांचा विचार न केल्यामुळे संघटनेने पुन्हा स्मरणपत्र दिले.
त्यानंतर इंदापूरच्या तहसीलदारांनी त्यांच्या दालनामध्ये कंपनी प्रतिनिधी, माथाडी कामगार, बोर्ड प्रतिनिधी, भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. तो जर बैठकीमध्ये 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ कार्यालयात मीटिंग घेण्याचे ठरलेले होते. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नसल्यामुळे संघटनेने 30 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनी तसेच प्रशासनाला लेखी निवेदन दिले.
दरम्यान, 24 जानेवारीपर्यंत प्रश्न न सुटल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिलेला होता. त्यानुसार, 24 जानेवारीपासून तहसील कचेरी इंदापूर यांच्यासमोर अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार दशरथ बंडगर, राजेंद्र रुपनवर, राजेंद्र पडळकर, संदीप पडळकर व सचिन राऊत हे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असूनही कोणताही तोडगा निघाला नाही.