पुणे : अवैध बांधकाम करण्याबरोबरच एकच फ्लॅट दोघांना विक्री करणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. नवनाथ महादेव माने (वय ४५, रा. कोंढवा) हे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
माने याने मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर या भागात मोठ्या प्रमाणावर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे केली आहेत. त्याच्याविरुद्ध महापालिकेने अनेकवेळा गुन्हे दाखल केले आहेत. तरीही नवनाथ महादेव माने याने परत अवैध बांधकाम चालू केल्याने पुणे महापालिकेचे अभियंता अमोल पुंडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला होता. आरोपी नवनाथ माने याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
माने याने साईबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकारे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षितेबाबत उपाय योजना केल्या नाहीत. तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री केल्याच्या, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.