पुणे : किरकोळ कारणावरून खून करण्याच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. जेवण न दिल्यामुळे पत्नीच्या छातीवर जोरजोरात बुक्क्या मारून तिचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना कात्रजमधील दत्तनगर परिसरात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी नराधम पतीला अटक केली.
तानाजी कांबळे असे नराधम पतीचे नाव आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय ४२, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय १९) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीला मारणारा नराधम पती पेंटरचे काम रोजंदारीवर करत होता. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तानाजी मद्यपान करून घरी आला. नशेतच त्याने पत्नी मधुराला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर चिडलेल्या माधुरीने ‘आज जेवण बनवले नाही’, असे उत्तर दिले. हे ऐकून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरूवात केली. पत्नी मधुराच्या छातीवर बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर मधुरा गंभीर जखमी झाली आणि यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.