छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाचवेळी नशेच्या आठ गोळ्या खाऊन तसेच गांजा पिऊन मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १६ ऑक्टोंबर रोजी बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विश्रांतीनगर परिसरात घडली. आहे. अमोल उर्फ नंदू संतोष दाभाडे (वय- २१, रा. विश्रांतीनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर निलेश सुभाष चव्हाण (वय-१९, रा. रेल्वे पटरीजवळ, शिवशाहीनगर), असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, १६ आक्टोबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अमोल हा त्याचे मित्र दीपक, अक्षय, बाळू, राहुल आणि राजू गायकवाड आदींसोबत विश्रांतीनगर गल्ली क्र. २ मधील हनुमान मंदिरात गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी आरोपी नीलेश चव्हाण हा त्याचा मित्र कुणालसोबत त्या ठिकाणी आला. त्याने अमोल दाभाडेला बाहेर बोलावले. थोडा वेळ थांब, मी लगेच बाहेर येत नाही. थोड्या वेळाने जेवण करून येतो, असे अमोलने त्याला सांगितले.
मात्र, नीलेशने बाहेर चल, आपल्याला बोलायचे आहे, असं म्हणून त्याला बळजबरी बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमोल जागेवरच उभा राहिला. त्याचवेळी नीलेश चव्हाणने अचानक खिशातून धारदार चाकू काढला आणि कोणाला काही कळण्याच्या आत अमोल दाभाडेच्या छातीत खुपसला. दुसरा घाव घालू नये म्हणून अमोलने लगेचच नीलेशला मिठी मारून रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र, काही क्षणात अमोल खाली कोसळला. तेथे हजर तरुणांनी आरोपी नीलेशला पकडण्याचा प्रयत्न केला असता सर्वांना चाकूचा धाक दाखवून तो पळून गेला. तरुणांनी जखमी अमोलला एन-४ मधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना अमोलचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमोलच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, निलेश हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. शहरात टवाळखोरांची भाईगिरी वाढल्याचे दिसत आहे. एकूणच शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.