पिंपरी : बायकोशी बोलत असल्याच्या संशयावरुन एकाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील आळंदी गावच्या हद्दीतील आवारे हॉस्पिटलच्या समोरील रोडवर ८ मार्चला दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी प्रशांत सदाशिव इनामदार (वय-४० रा. आळंदी, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून माऊली वामनराव पपुले (रा. केळगाव ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इनामदार हे आळंदी येथील आवारे हॉस्पिटलच्या समोरील सार्वजनिक रोडवरुन पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी लोखंडी पाईप घेऊन त्या ठिकाणी आला. त्याने इनामदार यांना अडवून ‘तू माझ्या बायको बरोबर बोलत आहे काय’ असा जाब विचारला. त्यावर इनामदार यांनी, ‘मी तुला ओळखत नाही.
मी कशाला तुमच्या बायकोबरोबर बोलू’ असे म्हणून पुढे चालू लागले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लोखंडी पाईपने पाठिमागून दोन्ही पायावर, हातावर बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडके करीत आहेत.