पुणे : पुण्यातील खडकी परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून खडकी ब्रिजच्या खाली मुळा नदीच्या पात्रात टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार रविवारी १७ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी आरोपीला धानोरी परिसरातून अटक केली आहे.
विजय राजू धोत्रे (वय ३३, रा. बॉम्बे सॅपर्सजवळ, येरवडा) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुधीर साहेबराव जाधव (वय ३२, रा. विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून आणि अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन खडकी पुलाखाली मुळा नदीच्या पात्रात जलपर्णीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचे निदर्शनास आले. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खडकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी एक चिठ्ठी आढळून आली.
तसेच मृत तरुणाच्या कपड्यांच्या तुकड्यांच्या आधारे तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खडकी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत तरुण येरवडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नातेवाइकांना भेटल्यानंतर मृत तरुणाच्या पायाला झालेल्या जुन्या जखमेवरून त्याची ओळख पटली.
दरम्यान, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी चतु:शृंगी, विश्रांतवाडी आणि येरवडा पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची तपास पथके तयार केली. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सुधीर जाधव याला सापळा रचून धानोरी परिसरातून ताब्यात घेतले असून इतर साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, सहा पोलीस निरीक्षक सुहास पाटील, सहा पोलीस निरीक्षक किरण देशमुख, पोलीस उप निरीक्षक, आण्णा गुंजाळ यांनी केली.