पुणे : पदपथावर झोपण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून मद्य पिऊन आलेल्या आरोपीने तीक्ष्ण शस्त्राने वार करून ज्येष्ठ नागरिकाचा खून केल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश भागाजी भद्रिके (वय ७५, रा. खडकी रेल्वे स्थानकासमोर) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी विकास रामचंद्र गायकवाड (वय ५२, रा. खडकी बाजार) याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी याबाबत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रिके आणि गायकवाड खडकी बाजार परिसरात किरकोळ कामे करीत होते. दोघे खडकी रेल्वे स्थानकासमोर पदपथावर राहत होते. पदपथावर झोपण्याच्या जागेवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आरोपी गायकवाड मद्य पिऊन आला आणि गाढ झोपेत असलेल्या भद्रिके यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या भद्रिके यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या गायकवाडला पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.