पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे मैत्रीच्या वादातून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा खून करण्यात आला आहे. झोपेत असतानाच मुलाच्या डोक्यात कोयत्याने आणि धारधार शस्त्राने वार करण्यात आला. ही थरारक घटना सोमवारी (दि. 18) सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत घडली. प्रकाश हरिसिंग रजपूत (वय १५) असे मृत्यू झालेल्य विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होता. तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. सकाळी शाळेत त्याचे इतर विद्यार्थ्यांबरोबर भांडण झाले होते. साडे दहा वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला. त्याचे आई-वडील कामावर गेले होते, तर भाऊ दहावीच्या परीक्षेला गेला होता.
मणेरवाडी हद्दीतील मह डोंगरावरील आनंद सोसायटीतील फार्ममधील घरात तो झोपला होता. गाढ झोपेत असतानाच हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयते, धारधार शस्त्रांनी वार केले. जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला. मात्र, शंभर फूट अंतरावर तो कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हवेली विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, अंमलदार संतोष तोडकर, संतोष भापकर आदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि हल्लेखोर तरुण (२ अल्पवयीन) यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती. प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. तसेच आरोपींची माहिती मिळाली नाही.