पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. एका अनोळखी तरुणीचा मृतदेह भयानक अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. तरुणीची हत्या करून तिचे हातपाय तोडून धड शिरावेगळं केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना तरुणीचे धड आढळून आले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील खराडी परिसरात एका कन्स्ट्रक्शनचे काम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना नदीपात्राजवळ एक मृतदेह आढळून आला. कामगारांनी तातडीने या प्रकारची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचे दिसून आले. मात्र, मृत मुलीची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय २० ते ३०च्या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हात, पाय तोडले, शीर धडावेगळं
तरुणीचा भयंकर अवस्थेत खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मृतदेहाचे हात, पाय तोडले, तसेच शीर देखील धडावेगळं केलं आहे. पोलिसांना फक्त तरुणीचे धड सापडले आहे. मृतदेहाची ओळख पेटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अज्ञात व्यक्तीने तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेने विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.