पुणे : पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. वाघोलीतील केसनंद फाटा येथून खासगी ट्रॅव्हल्स बसने अकोला येथे जाण्यासाठी निघालेल्या बाप लेकीची अनवधानाने ताटातूट झाली. मात्र, लोणीकंद वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत तत्काळ तिच्या वडिलांचा शोध घेतला आणि चिमुकलीला वडिलांच्या स्वाधीन केले. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश उमाळे हे आपली पाच वर्षीय मुलगी मनस्वी हिला घेऊन अकोला येथे निघाले होते. ते कोरेगाव पार्क येथून बसने जाण्यासाठी वाघोली केसनंद फाटा येथे आले. तेथे बसची वाट पाहत होते. मुलीला पाणीपुरी आणण्यासाठी तेथून ते दुसरीकडे गेले. वडील दिसले नाही म्हणून मनस्वी घाबरली. ती रडत रडत चौकात आली. तिला रडताना पाहून तेथे वाहतूक नियमन करीत असलेले लोणीकंद वाहतूक विभागाचे कर्मचारी स्वप्निल गालफाडे व सागर चौधरी यांनी तिला जवळ घेऊन विचारफूस केली. महिला कर्मचारी स्नेहल टकले यांनी तिचे रडणे थांबविले. गोड बोलून, आपुलकीने तिच्याकडे चौकशी केली असता तिने तिचे नाव, गाव याविषयी माहिती सांगितली. ही बाब लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांना कळाली.
दरम्यान, जाधव यांनी संपूर्ण माहिती घेवून तत्काळ कर्मचाऱ्यांना तिच्या वडिलांना शोधण्यासाठी पाठविले. वडिलांच्या शोधासाठी पोलीस जीपमधूनही अनाउन्समेंट करण्यात आली. वडील देखील मुलीच्या शोधात कावरेबावरे झाले होते. अखेर तिथेच फाट्यावर ते सापडले. वडील समोर आल्यावर मुलीला पुन्हा तिचे नाव विचारून हे कोण, अशी विचारणा केली. तिचेच वडील असल्याबाबत सर्व खात्री केल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
हरवलेले वडील पुन्हा सापडलेले पाहून मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. वडिलांनाही मुलगी समोर पाहून आनंदाश्रू आले. त्यानंतर दोघे पुढील प्रवासासाठी निघाले. वडील व मुलगी यांची भेट घडवून आणल्याने वाहतूक पोलीस कर्मचारीही मनोमन सुखावले.