उरुळी कांचन : तब्बल १०६ गुंठे जमीन नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी केली. जमिनीची सातबारावर नोंद करून देण्यासाठी पैशांची मागणी करून, १८ लाख रुपये खंडणी स्वरूपात उकळले. त्यानंतर सातबारा नोंद होण्यासाठी हरकत घेतलेला अर्ज काढून घेण्यासाठी ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास सातबारावर नोंद होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना थेऊर येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोर २७ जुलै ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बारामती येथील ३१ वर्षांच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कैलास परशुराम कडू (रा. जयभवानीनगर पौड रोड), सचिन कैलास कडू (रा. शिवणे) या दोघांविरुद्ध लोणीकाळभोर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भागीदारांनी दिलीप कडू आणि इतरांकडून १०६ गुंठे जमीन नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी केली. त्या जमिनीची सातबारावर नोंद करून देण्यासाठी दिलीप कडू यांचे नातेवाईक असलेले आरोपी कैलास कडू आणि सचिन कडू यांनी संगनमताने पैशांची मागणी केली. खरेदी खतातील उल्लेख केलेल्या रकमेव्यतिरिक्त फिर्यादींकडून प्रथम १८ लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले. त्यानंतर वेळोवेळी दीड लाख रुपये घेतले.
दरम्यान, फिर्यादीने सातबारा नोंद होण्यास हरकत घेणारा अर्ज केला होता. हा अर्ज काढून घेण्यासाठी फिर्यादींकडे आणखी ३० लाख रुपयांची खंडणी मागून, ती न दिल्यास सातबारावर नोंद होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.