उरुळी कांचन Breaking News : खामगाव टेक – हिंगणगाव येथे मुळा मुठा नदीवर दळणवळणाच्या सोयीसाठी मोठा पूल बांधण्याच्या मागणीसाठी उद्या एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हिंगणगाव खामगाव टेक येथे हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी आदी गावातील ग्रामस्थांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती या आंदोलनाचे संयोजक व हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश बापूराव कोतवाल यांनी दिली. (Breaking News)
मुख्यमंत्री, पालकमंत्री व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन
या आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त पुणे विभाग, जिल्हाधिकारी पुणे, पोलीस कमिशनर पुणे शहर पोलीस,तहसीलदार हवेली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. अशी माहिती अंकुश बापूराव कोतवाल यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की मुळा मुठा नदीवर हिंगणगाव येथे पूल बांधण्याची मागणी या परिसरातील हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, मिरवडी शिंदेवाडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस व उरुळी कांचन या ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत मासिक सभांमध्ये ठराव मंजूर करून घेऊन ती मागणी सन 2013 पासून शासनाकडे करीत आहेत. मात्र या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा प्रश्न अद्याप पर्यंत भिजत ठेवला आहे, गेल्या सुमारे दहा वर्षाच्या काळात वेगवेगळ्या पातळ्यांवर या पुलाच्या बांधकामासाठी मागणी पाठपुरावा करून देखील लोकप्रतिनिधी व प्रशासन याची दखल घेत नाही म्हणून आम्हाला जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागतोय अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी मांडली आहे.
या पुलामुळे नगर रोड, सातारा रोड आणि सोलापूर रोड हे तीन महामार्ग कमी अंतराच्या प्रवासाने जोडले जाणार असून जेजुरी, रांजणगाव, मोरगाव, थेऊर आदी तीर्थक्षेत्रे कमी वेळात जोडली जाणार आहेत तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थी कामगार शेतकरी यांना दळणवळणाची चांगली सोय उपलब्ध होऊन त्यांचा 12 किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. शासनाने आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून या पुलासाठी तरतूद करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांचेमार्फत हे निवेदन सा.बा.विभागाकडे पोहोचल्यानंतर सा.बा.उपविभाग क्र.1 सासवड चे शाखा अभियंता रोहित लकडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती लेखी पत्राद्वारे केली आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासनाकडे थेऊर – तारमळा – पेठ – उरुळी कांचन – खामगाव टेक – शिंदेवाडी रस्ता प्र.जि.मा 138 वर किलोमीटर 17/700 मध्ये मुळा मुठा नदीवर मोठा पूल बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून त्यासाठी 25 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याचे प्रस्तावित केले आहे. अशी माहिती दिली.
मात्र आंदोलनकर्त्यांनी सांगितले की आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, आम्हाला जोपर्यंत निधी मंजूर करुन पुलाचा प्रस्ताव मंजूर केल्याचे लेखी पत्र अधिकृतपणे मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan News | पूर्व हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP…!
Uruli Kanchan News : हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली गायकवाड यांची बिनविरोध निवड…!