पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश पिंपरी न्यायालयाने रविवारी दिला.
समता सैनिक दलाचा संघटक मनोज भास्कर घरबडे (वय- ३४, रा. पिंपरी), समता सैनिक दलाचा सदस्य धनंजय भाऊसाहेब इजगज (वय-२९, रा. आनंदनगर, चिंचवड), वंचित बहुजन आघाडीचा सचिव विजय धर्मा ओव्हाळ (वय – ४०, रा. आनंदनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या तिघांवर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला, सरकारी कामात अडथळा आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर शनिवारी चिंचवड येथील एका धार्मिक कार्यक्रमास पाटील शनिवारी (ता. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा उदघाटनासाठी चिंचवडगाव येथे आले.
या उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्याच्या घरी चहापानासाठी थांबले. यानंतर सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यावर काही क्षणात त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती.