पिंपरी : ऑफिसमध्ये का गेला, असं म्हणत १०-१२ जणांनी एकाच्या घरात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ११) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काळा खडक रोड, वाकड येथे घडली आहे.
सिद्दिक शेख, नयूम पठाण, गंगाराम वेताळ, सोमनाथ देवकर, दोन महिला आणि इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश गायकवाड (वय-३३, रा. स्वामी विवेकानंद नगर, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी रात्री त्यांच्या घरी होते. त्या वेळी आरोपी त्यांच्या घरी आले. तू सिद्दिक शेख यांच्या ऑफिसला का गेला, असं म्हणत फिर्यादीच्या घरावर लाथा मारल्या. नयूम पठाण याने फिर्यादीस घरात ढकलून दिले. टीपॉय फोडून त्यांना जबर मारहाण केली.
आरोपींनी काळा खडक येथे राहणारे निलेश ओव्हाळ, बाळासाहेब शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्यादेखील कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी बेकायदा जमाव जमवणे, दंगा करणे, गृह अतिक्रमण, महिलेवर हल्ला, आगळीक करणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.