पुणे : कोंढव्यात गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. परीक्षेला डमी उमेदवार म्हणून बसण्यास नकार दिल्याने घरात घुसून तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. साहिल देऊळकर (वय १९, रा. गौरव सोसायटी, कोंढवा) याच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंजिनिअरिंग ग्राफीक्स परिक्षेला आपल्या जागेवर डमी उमदेवार म्हणून बसण्यास नकार दिल्याने एका तरुणाच्या घरात घुसून त्याला पट्ट्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीत आहेत. साहिल याची सिंहगड अॅकडमी इंजिनिअरिंग येथे इंजिनिअरिंग ग्राफीक्स होती. या परिक्षेला साहिल याने फिर्यादीला त्याच्या जागेवर डमी म्हणून बसून परीक्षा देण्यास सांगितले होते. त्याने नकार दिल्यावरही साहील फिर्यादीला जबरदस्तीने परिक्षा हॉलपर्यंत घेऊन गेला. त्याला परीक्षा देण्यासाठी जबरदस्ती वारंवार करत होता. परंतु, फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यानंतर फिर्यादी हा कोंढव्यातील घरी आला. सायंकाळी रागाच्या भरात साहिल त्याच्या घरी आला. फिर्यादी यांना कानाखाली, मानेवर पाठीवर मारहाण केली. एवढेच नाही तर कमरेचा पट्टा काढून बेदम मारहाण केली. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करीत आहेत.