केडगाव : घरी एकटीदुकटी बाई, आपला नवरा कामानिमित्त पुण्यात गेलेला असताना, घरी चाललेली कामाची लगबग या घाईगडबडीत आपले तीन वर्षांचे लेकरू बाहेर अंगणात खेळत असताना अचानक नजरेआड गेले. तो कुठे न दिसल्यामुळे आईचा जीव कासावीस झाला होता. भेदरलेल्या मनस्थितीत डोळ्यांतून अश्रू ढाळत थेट रस्ता धरला केडगाव पोलीस चौकीचा, साहेब माझं लेकरू सकाळपासून हरवले आहे. मला काही समजेना असे म्हणत ती माय धायमोकलून रडत होती.
बोरीपार्धी (ता. दौंड) येथील थोरात मळा येथून रविवार १९ मे रोजी सकाळी ७ वा सुमारास तीन वर्षीय आर्यन मल्हारी थोरात बालक राहत्या घरातून निघून गेला होता. बराच वेळ शोध घेतल्यानंतर तो न सापडल्याने त्याची आई कल्याणी थोरात यांनी केडगाव पोलीस चौकी येथे धाव घेतली. पोलिसांनी सर्व हकिकत जाणून घेतल्यानंतर आर्यनचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक बारीक गोष्टींचा सुगावा घेत पोलीस त्या तीन वर्षांच्या बालकाचा शोध घेत होते. पुढे जात असताना एका महिलेने सांगितले की, एक लहान मूल कुत्र्यासोबत खेळत खेळत या रस्त्याने पुढे गेले आहे.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक उत्तम कांबळे, रोलीस नाईक बाळू चोरामले, पोलीस कॉन्स्टेबल भारत भोसले यांनी हाच धागा पकडत ते दोन किमी अंतरापर्यंत पोहोचले, तेथे सातपुते वस्ती येथे हा बालक मुलांसोबत खेळताना आढळून आला. आर्यनला सुखरूप त्याच्या आईकडे सोपवण्यात आले. या वेळी कल्याणी थोरात यांनी केडगाव पोलिसांचे आभार मानले.