पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . मोबाइलवरील मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाने आईवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना धनकवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी परिसरात राहायला आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत मुलगा मोबाइलवरील मालिका बगत बसला होता. त्यावेळी आईने जास्त वेळ मोबाइलवरील मालिका पाहू नको, असे सांगितले. त्यानंतर तो मालिका बगतच होता. त्यामुळे आईने त्याच्या हातातून मोबाइल संच हिसकावून घेतला आणि मालिका बंद केली.
दरम्यान, आईने मोबाइल संच हिसकावून घेतल्याने मुलगा चिडला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरातील लाकडी फ्रेम फोडली, तसेच कात्रीने आईवर वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घरातील खिडकीच्या काचादेखील फोडल्या. घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास हवालदार जाधव करत आहेत.