पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी भागातील गुंडांकडून एका वाईन शॉपमधे गळ्यावर कोयता ठेवून बीअरच्या बाटल्या लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उधार दारू दिली नाही म्हणून तिघांनी थेट बिअर शॉपीमधील एकाच्या गळ्याला कोयता लावून हाताने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर त्याच्या साथीदारांनी शॉपीमधून दोन बियरच्या बाटल्या चोरून पळ काढला.
ही घटना विश्रांतवाडी परिसरातील टिंगरेनगरमध्ये घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. स्वप्निल ऊर्फ सोप्या बालेकर (२५), आकाश ऊर्फ बॉब (२७), प्रकाश शिंदे (२३) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील बालेकर आणि शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहायला आहेत. फिर्यादी यांचे टिंगरेनगर भागात बिअर शॉपी आहे. आरोपी स्वप्निल आणि साथीदार नेहमी तिथे दारू आणण्यासाठी जात असत. रविवारी सायंकाळी फिर्यादी शुभम दुकानावर होता. त्या वेळी आरोपी स्वप्निल आणि साथीदार तेथे आले. त्यांनी शुभमला उधारीवर दारूची मागणी केली. याला शुभमने विरोध केला.
त्यामुळे संतापलेल्या स्वप्निलने आपल्याकडील कोयता काढून शुभमच्या गळ्याला लावला. त्यानंतर साथीदारांनी जबरदस्तीने दोन बिअरच्या बाटल्या चोरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.